सातारा : सातारा जिल्ह्यात गणरायाच्या आगमनासाठी एक आठवडा शिल्लक आहे. गणेशोत्सवाच्या विविध परवानग्या मिळवण्यासाठी गणेश मंडळांना बरीच धावपळ करावी लागते. त्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक खिडकी योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी संदीप शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देऊन केली आहे.
शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, अवघ्या सात दिवसाच्या अंतरावर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये विविध गणेशोत्सव मंडळांची मंडप उभारणीपासून ते किरकोळ कामांची तयारी सुरू आहे. मंडप उभारणी सह विद्युत कनेक्शन, रस्ते खुदाई, कॅमेरे बसवणे, ध्वनिक्षेपक इत्यादी बाबींची परवानगी सातारा जिल्हा पोलीस, सातारा नगरपालिका यांच्या मार्फत घ्यावी लागणार आहे. तसेच विश्वस्त न्यासाची नोंदणी, त्याचे पुनरुज्जीवन याकरता धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी गरजेची आहे. मात्र तीन कार्यालयांमध्ये तीन ठिकाणी हेलपाटे मारताना गणेश भक्तांची प्रचंड कसरत होत आहे.
गणेश मंडळाच्या सर्व परवानग्या सातारा नगरपालिकेत अथवा जिल्हा प्रशासनाच्या प्रदान कार्यालयांमध्ये एकाच ठिकाणी मिळाव्यात. या सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना जिल्हाधिकारी या नात्याने आपण तातडीने सुरू करावी. ज्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची दगदग वाचणार आहे. याबाबत सातारा नगरपालिका, जिल्हा पोलीस व धर्मादाय आयुक्त कार्यालय यांना तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.