सातारा : खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या मनोमिलनातील शिलेदारांची महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्प्यातील बैठक सोनगाव येथील बंगल्यावर सकाळी पार पडली. या बैठकीमध्ये प्रत्यक्ष जागावाटप आणि समन्वयक निर्णय याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीबाबत कोणत्याही सूत्रांनी दुजोरा दिला नाही .कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी सुद्धा उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट आणि 130 गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी सातारा तालुक्यातील आठ गट आणि 16 गणासाठी वेगवेगळ्या गटातून आणि गणातून इच्छुकांचे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. सातारा शहरातील दोन समांतर सत्ता केंद्र असणाऱ्या जलमंदिर व सुरुची या दोन्ही बंगल्यांवर उत्साही कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण बैठक सोनगाव येथील बंगल्यावर झाली. यावेळी लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर तसेच राजू भैय्या भोसले इत्यादी यावेळी उपस्थित होते.
गत पंचवार्षिक काळामध्ये सातारा तालुक्यामध्ये दहा गट आणि 20 गण होते. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सात गटावर तर उदयनराजे यांचे तीन गटांवर वर्चस्व होते तर सातारा पंचायत समितीमध्ये ११ जणांवर शिवेंद्रसिंहराजे यांचे तर नऊ गणावर उदयनराजे यांच्या समर्थकांचे वर्चस्व होते. मात्र गटाची आणि गणाची रचना बदलल्याने सातारा तालुक्यात आठ गट आणि 16 गट सध्या निर्देशित आहेत. नागठाणे कोडोली पाटखळ आणि खेड हे चार गट राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून येथील निर्णय आणि येथील द्यावयाचा उमेदवार यावर राजकीय मतैक्य होणे महत्त्वाचे आहे. या उमेदवाराला उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे या दोघांचाही पाठिंबा असणे आवश्यक आहे. त्यासंदर्भाने दोन्ही नेत्यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती आहे मात्र या बैठकीत प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही महाराजांची सुमारे 45 मिनिटे कमरा बंद खलबते झाल्याचे सांगण्यात आले.
पाटखळ आणि कोडोली गटासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा
पाटखळ आणि कोडोली या दोन महत्त्वपूर्ण गटासाठी सुद्धा आमदार महेश शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही गटांमध्ये सुद्धा महेश शिंदे यांच्यासह शिवेंद्रसिंह राजे व उदयनराजे यांचे प्रभावित कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे येथे सुद्धा समन्वयाने निर्णय व्हावा ही अपेक्षा आहे. त्या संदर्भाने महेश शिंदे यांनी उदयनराजे यांच्याशी 45 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीत रणनीती काय ठरली अथवा काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.