सातारा : सातारा शहरातील राजवाडा बसस्टॉप परिसरात गाडी काढण्याच्या कारणावरून दोन गटांत तीव्र वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा बस स्टॉपसमोरील कॉलिटी पान शॉपजवळ श्रेयस संतोष पवार (वय २२, रा. मंगळवार पेठ, सातारा) याने भाजीपाला विक्रीसाठी चारचाकी गाडी उभी केली होती. यावेळी शाईद राजमहंमद बागवान (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) याने त्या ठिकाणी गाडी लावू नये व तात्काळ गाडी काढावी, असे पवार याला सांगितले. आपण थोड्या वेळात गाडी काढतो, असे पवार याने सांगितल्याने शाईद बागवान व अल्ताफ बागवान हे चिडून गेले. त्यानंतर त्यांनी हाताने मारहाण केल्याचा आरोप श्रेयस पवार याने आपल्या फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, याच घटनेत पान टपरीच्या काचा व खुर्च्या फोडून नुकसान केल्याचा, तसेच ''गोळ्या घालून खल्लास करेन'' अशी धमकी देत फळगाडा ढकलून पलटी केल्याचा आरोप शाईद बागवान यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी दिनांक १९ रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे व धमाळ करत आहेत.