रशियाने उ. कोरियाला दिले 'अँटी एअर मिसाईल'

रशियाने उ. कोरियाला दिले 'अँटी एअर मिसाईल'

रशिया : रशियाने उत्तर कोरियाला अत्याधुनिक अँटी एअर मिसाईल (विमानविरोधी क्षेपणास्त्र) पुरवली आहेत. त्या बदल्यात युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने आपले १० हजारांहून अधिक सैनिक रशियाला पाठवले आहेत, असा दावा दक्षिण कोरियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला असल्‍याचे वृत्त 'AP'ने दिले आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा संचालक शिन वॉनसिक यांनी शुक्रवारी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात सांगितले की, रशियाने उत्तर कोरियाला हवाई संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी अत्याधुनिक एण्टी एअर मिसाईल आणि अन्‍य शस्‍त्रे पुरवली आहेत. त्‍याचबरोबर रशियाने उत्तर कोरियाला आर्थिक मदतही केली आहे. रशियाच्‍या या कृतीने दक्षिण कोरियासह अमेरिकाही चिंतित आहेत की रशिया आपले संवेदनशील अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देखील उत्तर कोरियाला हस्तांतरित करू शकतो, असा संशयही व्‍यक्‍त होत आहे.

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने बुधवारी (दि.२०) सांगितले होते की, उत्तर कोरियाने अलीकडेच रशियाला अतिरिक्त तोफाही पाठविल्‍यात आहेत. गेल्या महिन्यात रशियाच्या शस्त्रास्त्रांचा साठा भरून काढण्यासाठी उत्तर कोरियाने ऑगस्ट 2023 पासून तोफखाना, क्षेपणास्त्रे आणि इतर पारंपारिक शस्त्रांचे 13,000 कंटेनर रशियाला पाठवले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाउत्तर कोरिया आणि रशियाने प्योंगयांगमध्ये उच्च-स्तरीय चर्चेनंतर आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठीच्‍या करारावर स्वाक्षरी केली आहे.