पालिकेने हटवली साईबाबा मंदिर परिसरातील अतिक्रमणे

पालिकेने हटवली साईबाबा मंदिर परिसरातील अतिक्रमणे

सातारा : गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर नजीकची अतिक्रमणे सातारा पालिकेने सोमवारी हटवली. यावेळी पालिकेचे कर्मचारी आणि विक्रेते यांच्यामध्ये भर दुपारी जोरदार वादावादी झाली. मात्र सरकारी कामात अडथळा आणाल तर कारवाई करू, असा सज्जड इशारा देण्यात आल्याने विरोधाचे सुर मावळले. पालिकेने येथील आठ अतिक्रमणे हटवली आहेत. यापुढेही गोडोली परिसरात कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोडोली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी गोडोली चौक ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय यादरम्यानच्या अतिक्रमणांची तक्रार करीत यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. यापूर्वी येथील अतिक्रमणांची वारंवार लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारींची दखल घेऊन सातारा पालिकेने सोमवारी थेट कारवाईला सुरुवात केली. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या आठ कर्मचार्‍यांच्या पथकाने गोडोलीच्या साईबाबा मंदिर परिसरात येऊन दोन टपर्‍या आणि सहा हातगाड्या हटवल्या. या टपर्‍यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार होती.

या कारवाईला विक्रेत्यांनी विरोध करत पालिका कर्मचार्‍यांशी वाद घातला. विरोधकांना तुम्ही अतिक्रमित जागेमध्ये व्यवसाय करत आहात, असा इशारा प्रशांत निकम यांनी दिला. पण तुम्ही पावत्या तर घेता ना? असा प्रतिवाद विक्रेत्यांनी केला. शासकीय कामात अडथळा आणू नका, असा इशारा देत पालिका कर्मचार्‍यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. सर्व अतिक्रमण हटवल्यानंतर येथील परिसराने मोकळा श्वास घेतला. गोडोली कॉलनी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय यादरम्यानची अतिक्रमणे मंगळवारी काढण्यात येणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले आहे. सुमारे दीड तास ही कारवाई सुरू होती. सर्व अतिक्रमण साहित्य टिपरमध्ये घालून येथील हुतात्मा उद्यान परिसरात हलवण्यात आले आहे.