'घिबली' ट्रेंडला प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा विरोध

'घिबली' ट्रेंडला प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘घिबली’ हा ट्रेंड कमालीचा चर्चेत आहे. या ट्रेंडची भुरळ अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच पडली आहे. सोशल मीडियावर सर्वच जणं त्यांचे कार्टून स्टाईलमधले फोटो शेअर करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र या ट्रेंडची चर्चा होत असताना प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार विशाल ददलानीने या ट्रेंडबद्दल महत्वाचे विधान केले आहे. या गायकाने इन्स्टास्टोरी शेअर करत मी या ‘घिबली’ ट्रेंडचा वापर करणार नाही, एआयनं कलाकारांची ही कला चोरली, असे म्हणत त्याने टीका केली आहे.

स्टुडिओ घिबली ट्रेंड हा चॅट जीपीटीचा एक टूल आहे. हा टूल आपले कार्टून पद्धतीतील फोटो तयार करुन देतो. दरम्यान, काही तासांपूर्वीच गायक विशाल ददलानीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या इन्स्टास्टोरीमध्ये गायक म्हणतो, या ट्रेंडचा फायदा घेणारे लोकं “AI साहित्यिक चोरी” चा भाग बनत आहेत. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये गायकाने आपल्या चाहत्यांना ‘घिबली’ट्रेंडचा वापर करून, त्याचे फोटो बनवू नयेत आणि त्यामध्ये त्याला टॅग करू नये, अशी विनंती त्याने केली आहे.

शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीमध्ये विशाल ददलानी म्हणतो की, “तुम्ही ज्या स्टुडिओ ‘घिबली’स्टाईलचा वापर करून माझे जे फोटो बनवत आहात, ते मी पोस्ट करणार नाही. मला माफ करा. एका कलाकारानं आयुष्यभर केलेल्या कामाची चोरी एआयनं केली आहे. त्याचं समर्थन करण्यास मी तयार नाही.” पुढे त्याने यामुळे पर्यावरणाचंदेखील मोठं नुकसान होत असल्याचे म्हटले. गायक त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला, “हे पर्यावरणासाठीदेखील हानिकारक आहे. कृपया असे फोटो बनवणं बंद करा”, असे लिहीत त्याने ‘घिबली’ स्टाईलला विरोध दर्शवला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे घिबली स्टाईलमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये कियारा अडवणी, बॉलीवूडचे बादशाह म्हणजेच अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रासह अनेक सेलिब्रिटींचे घिबली स्टाईलमधील फोटो पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांचे हे फोटो शेअर केले आहेत. काही चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांचे फोटो घिबली स्टाईलमध्ये बनवून, त्यांना सोशल मीडियावर टॅग केल्याचे दिसत आहे.