महामार्गावर अपघातात जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू; एकाच ठिकाणी, एका महिन्यात दोन बँक कर्मचार्‍यांचा मृत्यूने हळहळ

महामार्गावर अपघातात जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू; एकाच ठिकाणी, एका महिन्यात दोन बँक कर्मचार्‍यांचा मृत्यूने हळहळ

सातारा  : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा-कराड लेनवर बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत ह्युंदाई कार (नोंदणी क्रमांक नाही) व मोटारसायकल यांचा शनिवारी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल (एमएच-11-सीटी-2427) वरील सागर सुभाष शिवणकर (वय 25, रा. खर्शी तर्फ कुडाळ, ता. जावळी) यांचा मृत्यू झाला. शिवणकर हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागठाणे शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर शिवणकर हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास बँकेत निघाले होते. बोरगाव येथील हॉटेल पानेरीच्या समोर त्यांच्या मोटारसायकलला कराडच्या दिशेने निघालेल्या ह्युंदाई कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सागर शिवणकर हे गाडीवरून जोरात कोसळून गंभीर जखमी झाले. या धडकेत मोटारसायकलचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुधीर भोसले, संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व स्थानिक नागरिकांनी शिवणकर यांना सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना, डॉक्टरांनी शिवणकर यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कारचालक ओमकार कृष्णा दळवी (रा. बड्याचीवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन साळुंखे यांनी अपघाताची खबर दिली.

दुर्दैवी योगायोग

सागर शिवणकर यांचे वडीलदेखील जिल्हा बँकेचे कर्मचारी होते. त्यांचा करोना काळात मृत्यू झाला होता. त्यानंतर सागर यांना बँकेत नोकरी मिळाली होती. आई, बहीण व कुटुंबाची जबाबदारी सागर यांच्यावर होती. ते नागठाणे शाखेत उत्तम काम करत होतेा. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या अपघाताने एक दुर्दैवी योगायोग समोर आला आहे. या अपघातस्थळीच वीस दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी श्रीमंत तरडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता.