वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा क्षयरोग संदर्भात धक्कादायक अहवाल

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा क्षयरोग संदर्भात धक्कादायक अहवाल

गेल्या काही वर्षात कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात थैमान घातल्याचे समोर आले होते. या आजारामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर मंकीपॉक्स या आजाराने लोकांची धास्ती वाढवली. त्यानंतर आता आणखी एका धोकादायक आजाराबाबत WHO ने अहवाल प्रसिद्ध केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने टीबी म्हणजेच क्षयरोग संदर्भात धक्कादायक अहवाल दिला आहे. गेल्या वर्षी 80 लाखांहून अधिक लोक क्षयरोगाने ग्रस्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. युनायटेड नेशन्स एजन्सीने याबाबत डेटा ट्रॅक करण्यास सुरुवात केल्यापासून रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. हा रोग फुफ्फुसांवर परिणाम करतो, जे हवेतून होणारे जिवाणू संक्रमण आहे.

अहवालानुसार, जगातील 1/4 लोकसंख्या टीबीचे रुग्ण आहे. 80 लाखांहून अधिक लोक याचा सामना करत आहेत. त्याची सुरुवातीची लक्षणं फक्त 5 ते 10 टक्के लोकांमध्ये दिसतात. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, टीबी रोग कोविड -19 ची जागा घेण्याची शक्यता आहे. जी कोविड सारखी महामारी बनणार आहे. कारण सध्या सर्वाधिक मृत्यू टीबीमुळे होत आहेत.

WHO च्या अहवालानुसार, टीबीमुळे जगात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. गेल्या वर्षी 1.25 दशलक्ष (12.5 लाख) पेक्षा जास्त लोकांचा टीबीमुळे मृत्यू झाला. या मृत्यूंची संख्या कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंनंतर येते, परंतु या आजारामुळे मृत्यूची संख्या ज्या प्रकारे वाढत आहे, ती लवकरच कोविडची जागा घेऊ शकते. त्याच वेळी, 2023 मध्ये एचआयव्हीमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये देखील वाढ झाली आहे.

WHO ने क्षयरोगाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या ठिकाणांची नावे दिली आहेत. या यादीत दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिक क्षेत्राची नावे समाविष्ट आहेत. ज्यामध्ये निम्म्याहून अधिक रुग्णसंख्या ही भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिपाइन्स आणि पाकिस्तानमध्ये आहेत.

क्षयरोग हा हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. फुफ्फुसाचा किंवा घशाचा टीबी रोग असलेली व्यक्ती खोकते, शिंकते, बोलते किंवा गाते तेव्हा टीबीचे जीवाणू हवेतून पसरतात. हे बॅक्टेरिया जवळच्या लोकांमध्ये पसरतात, ज्यामुळे त्यांनाही या आजाराची लागण होऊ शकते.