सातारा : सातारा शहरात वाढत्या वाहतूक नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई राबवली. विना वाहनचालक परवाना, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश हॉर्न तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून एकूण २९ दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक व वर्दळीच्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांची वाहने अडवून त्यांची कागदपत्रे, वाहनचालक परवाने व वाहनातील बदलांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान काही दुचाकी विना नंबर प्लेट आढळून आल्या, तर काही वाहनांवर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात आल्या होत्या. याशिवाय कर्णकर्कश हॉर्नचा वापर, ट्रिपल सीट प्रवास तसेच विना परवाना वाहन चालविण्याचे प्रकार उघडकीस आले. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे व नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे हा या कारवाईचा उद्देश असून, अशा प्रकारच्या धडक मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.