एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात महायुतीतील नेत्यांना यश

एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात महायुतीतील नेत्यांना यश

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ शिंदेंची  नाराजी संपली आहे. एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यात महायुतीतील नेत्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी गृहमंत्रीपदही सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा हट्टही सोडला आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रकृती खराब झाल्याने गेल्या आठवडा भरापासून ते साताऱ्यातील त्यांच्या गावी विश्रांती घेत होते.त्यांच्या नाराजीचा बातम्याही समोर आल्या. अखेर भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल रात्री ठाण्यात त्यांची भेट घेतली. जवळपास एक दीड तास बैठक झाल्यानंतर गिरीश महाजन निघून गेले.

गिरीश महाजन म्हणाले की, मला त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली आहे, महायुतीमध्ये सर्व काही ठीक आहे. एकनाथ शिंदे यांचे मन मोठे आहे. तो छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारा नाही. शिंदे नाराज नाहीत. उद्यापासून सगळे एकत्र काम करताना दिसणार आहेत. पाच वर्षे सरकार भक्कमपणे चालवावे लागते. उद्या, भाजप, शिंदे, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते सकाळी 10 नंतर आझाद मैदानात जाऊन शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतील आणि एकजूटही दाखवतील. एकनाथ शिंदे हे उद्या दुपारी वर्षाला येणार असून 6 डिसेंबर रोजी डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसंदर्भात बैठक घेणार आहेत.