सातारा : सातारा तालुक्यातील दहिवड बसस्टॉपनजीक सातारा-पाटेघर रस्त्यावर अल्पवयीन दुचाकी चालक युवतीमुळे झालेल्या भीषण अपघातात वयोवृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरगडवाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत दहिवड बसस्टॉपजवळ अल्पवयीन युवती ऍक्टिव्हा दुचाकी (क्र. एम.एच. ११ डी.पी. ५८६४) वरून ट्रिपल सीट प्रवास करत होती. धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवत असताना तिचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून शेतीच्या कामासाठी दुचाकीवरून जात असलेले चंद्रकांत कोंडीबा पोपळे यांना तिने जोराची धडक दिली.या अपघातात पोपळे यांच्या डोक्यास व चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी मृत पोपळे यांचा मुलगा अमित चंद्रकांत पोपळे (वय ३९, रा. आरगडवाडी, ता. जि. सातारा) यांनी १८ जानेवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन दुचाकी चालक युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुचाकी चालक युवती अल्पवयीन असल्याने संबंधित दुचाकी मालकाचा शोध घेऊन त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे यांनी दिली आहे. या घटनेमुळे अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकाराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.