डॉ. कोल्हे यांना जशी खासदारकीला पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या : अतुल बेनके

डॉ. कोल्हे यांना जशी खासदारकीला पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या : अतुल बेनके

पुणे : गेल्या पाच वर्षांमध्ये जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. विकास करत असताना कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा याचा विचार कधीही केला नाही आणि इथून पुढच्या काळातही करणार नाही माझ्यावर कोणी कितीही टीका केली तरीही मी कोणावरही टीका करणार नाही. मी पक्ष बदलला नाही खासदारकीला जशी तुम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या असे भावनिक आवाहन करत खा. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची जोडी तुटणार नाही. ती कायम बरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अतुल बेनके यांनी केले.

बेनके म्हणाले, चिल्हेवाडी पाइपलाइन योजना, बिबट सफारी, वडज उपसा सिंचन, क्रीडा संकुल, पर्यटन विकास, शिव स्मारक, रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, वळण बंधारे, पाझर तलाव यासारख्या विविध कामांच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारने शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज बिले माफ केली आहेत तसेच महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना दिवसा लाइट देण्याची घोषणा, जुन्नर तालुका बिबट आपत्तीग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे तसेच बिबट हल्ल्यांच्या संदर्भात विविध उपाययोजना करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक गावात मंजूर केलेली कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी आणि तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे भविष्यातील दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन यांसह पाच वर्षात लोकहितार्थ राबविण्यात आलेले अनेक सामाजिक उपक्रम, शासकीय योजना या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन बेनके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.