नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम करू : ना. जयकुमार गोरे

नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम करू : ना. जयकुमार गोरे

दहिवडी/खटाव : माण-खटावसह ज्या भागात मे महिन्यातील अतिवृष्टीने रस्ते, घरे, शेतरस्ते, पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा संसार उघड्यावर आला. शेतकर्‍यांच्या नगदी पिकांचे नुकसान होवून मोठे आर्थिक नुकसान झाले. हे चित्र अतिशय गंभीर असून आमचे सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम आहे. माता-भगिनींसह शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही निश्चित करणार आहोत. त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी फिल्डवर उतरुन पंचनामे करत आहेत. राज्य व गरज पडली तर केंद्र सरकारकडूनही नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. 

मे महिन्यातील विक्रमी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, प्रांत उज्ज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, गविआ प्रदीप शेंडगे, अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकामसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ना. जयकुमार गोरे यांनी मलवडी, कुळकजाई, श्रीपालवण, परतवडी, आंधळी, पळशी, म्हसवड या भागात प्रत्यक्ष बांधावर व पडझड झालेल्या घरे, पूल आणि रस्त्यांना भेटी देवून अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

ना. गोरे पुढे म्हणाले, गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस राज्यातील विविध भागात झाला. रस्ते, शेती, घरे आणि पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माता-भगिनी आणि शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानीचे चित्र अत्यंत गंभीर आहे. आमचे सरकार सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठिशी ठाम आहे. आम्ही सर्व नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसणार आहोत. शेती, घरे, रस्ते आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सातारा जिल्ह्यातही कृषीसह सर्वच विभागांना नुकसानीचे पंचनामे फिल्डवर जावून करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बीडिओ, तहसीलदार, प्रांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि त्यांचे कर्मचारी झाडून सर्वजण कामाला लागले आहेत. नुकसानग्रस्तांना राज्य आणि केंद्र शासनाकडूनही मदत केली जाणार आहे. मंत्रालयातील वॉर रुममधून दररोज नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. माण-खटावसह दुष्काळी भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत नाही. आत्ताच्या अनपेक्षित पावसाने बंधारे, तलाव भरले असले तरी नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही ना. गोरे यांनी सांगितले.

चिखल तुडवताना समोर आले भयावह वास्तव

ना. जयकुमार गोरे शासनाच्या विविध विभागांच्या अधिकार्‍यांसह चिखल तुडवत शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. अतिवृष्टीमुळे पाण्यात कुजलेली नगदी पिके पाहून ना. गोरेंसह सर्वजण गहिवरले. पडझड झालेल्या घरांमधील उघड्यावर पडलेले संसार पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ना. गोरेंनी पडझड झालेल्या घरांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. आपबिती सांगताना शेतकरी आणि माताभगिनींच्या अश्रूंचा बांध फुटला. अश्रू अनावर झालेल्यांना धीर देत ना. गोरेंनी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.