…मीच बारामतीकरांचा वाली : अजित पवार

…मीच बारामतीकरांचा वाली : अजित पवार

बारामती : बारामतीत काका विरुद्ध पुतण्या, अशी रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार हे निवडणुकीत उतरल्यापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामती तालुक्याच्या खेडोपाडी भिंगरी लावून फिरत आहेत. लोकसभेला गंमत केली, विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमत होईल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही, असं विधान अजितदादांनी बारामतीच्या एका गावात केलं होतं.

एकप्रकारे मीच बारामतीकरांचा वाली आहे, असं अजितदादांकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी टोलेबाजी केली आहे.

“लोकसभेला गंमती केली. मात्र, विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमतच होईल. काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्याची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलंय निवडणूक आणि खासदारकी लढणार नाही. त्यानंतर कोण बघणार आहे, याचा विचार करा… कुणात एवढी धमक आणि ताकद आहे, हेही पाहा,” असं म्हणत अजितदादांनी मीच नंतर वाली असल्याचं सांगितलं होतं.

याबद्दल साताऱ्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, “उद्या कुणी म्हणत असेल, तर मीच देशाचा प्रमुख आहे… तर म्हण बाबा माझी काय तक्रार नाही. पण, लोकांनीही प्रमुख म्हणलं पाहिजे… आपण म्हणून काय उपयोग…”

“तसेच, लोकसभेला गंमत केली म्हणजे काय? लोकांनी त्यांना मते दिली नाहीत, हेच ना… लोकांनी योग्य वाटेल, ते केलं,” असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी अजितदादांच्या विधानावर दिलं आहे.