उरमोडी धरणासाठी 3042 कोटींच्या कामांना मंजुरी

उरमोडी धरणासाठी 3042 कोटींच्या कामांना मंजुरी

सातारा : केंद्रीय जल आयोग प्रकल्प मूल्यांकन समितीच्या बैठकीत उरमोडी धरणाच्या  कामांसाठी 3042.67 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावांवर विचार होऊन उर्वरित कामांना आता तांत्रिक प्रक्रियेनंतर गती मिळणार आहे. माण, खटाव व सातारा तालुक्यातील सुमारे 27 हजार 750 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उरमोडी नदीवर उरमोडी धरणाचे पाणी कण्हेर जोड कालव्याद्वारे व पुढे उरमोडी उपसा योजनेअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथे दोन टप्प्यात साडेचारशे फूट उचलून खटाव माण तालुक्यातील दुष्काळी भागाला सिंचन सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. त्याकरता 1417.19 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. तसेच 2018 मध्ये प्रकल्पाचा समावेश केंद्र सरकारच्या बीजेएसवाय योजनेत करण्यात आला. 1417. 19 कोटीच्या मान्यतेच्या मर्यादा असल्यामुळे नंतरच्या काळात केंद्राचा निधी मिळण्यास अडचणी येत होत्या. उरमोडी धरण मोठ्या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी आम्ही जनशक्ती मंत्रालयाचे मंत्री सी आर पाटील यांची भेट घेऊन मागणी केली होती. तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन संघटन बैठकीत 3042.67 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला हिरवा कंदील मिळाला आहे. 

या निधीच्या उपलब्धतेमुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती मिळून हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे. यामुळे माण तालुक्यातील 9725, खटाव तालुक्यातील 9725 आणि सातारा तालुक्यातील 8300असे 27,750 हेक्टर क्षेत्र ओलिखाली येणार आहे व माण-खटाव तालुक्यांचा दुष्काळी ठपका या निमित्ताने पुसला जाणार आहे. या निधीच्या मान्यतेबद्दल उदयनराजे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुष्काळग्रस्तांच्या वतीने विशेष आभार मानले आहेत.