अजितदादा सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला

अजितदादा सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामागील कारण म्हणजे 2023 मध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतर एकदाही सार्वजनिकपणे शरद पवारांना न भेटलेले त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहपरिवार आज अचानक सकाळी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवारांबरोबर त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत. खास म्हणजे याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

शरद पवार हे आज दिल्लीतच असून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महायुती सरकारच्या खातेवाटपाच्या चर्चेसाठी अजित पवारही नवी दिल्लीतच आहेत. त्यानिमित्तानेच अजित पवार पत्नी तसेच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासहीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही अजित पवारांबरोबर होते. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारही यावेळेस त्यांच्यासोबत होते. शरद पवारांच्या घराच्या दारातच त्यांची त्यांची कन्या तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सर्वांच स्वागत केलं. या निमित्ताने राज्याच्या राजकारणामध्ये नव्याने काही मनोमिलन होणार का याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं.

दरम्यान, या भेटीनंतर शरद पवारांच्या घराबाहेर पडल्यावर अजित पवारांनी, "आमच्या सामान्यपणे चर्चा झाली. राजकीय विषयावर आमची चर्चा झाली नाही. पवारांशी विविध विषयांवर चर्चा झाली. राजकारणापलीकडेही संबंध असतात. मी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो," असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.