कॅनडात हिंसाचाराच्‍या भीतीने त्रिवेणी मंदिरातील कार्यक्रम रद्द!

कॅनडात हिंसाचाराच्‍या भीतीने त्रिवेणी मंदिरातील कार्यक्रम रद्द!

कॅनडा : कॅनडामधील ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिराने रविवारी भारतीय वाणिज्य दूतावासाने जीवन प्रमाणपत्र वितरण समारंभ रद्द केला आहे. स्‍थानिक पोलिसांनी खलिस्तान्‍यांनी दिलेल्‍या धमक्यांवर चिंता व्यक्त केल्‍याने हा निर्णय घेण्‍यात आला आहे. दरम्‍यान, ३ नोव्हेंबर २०२४ रोजी खलिस्तानी समर्थकांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील कॉन्सुलर कॅम्पवर हल्ला केला होता. तेव्‍हापासून हिंदूंना धमकी देण्‍याचे सत्र कायम राहिले आहे.

ब्रॅम्प्टन त्रिवेणी मंदिराच्‍य वतीने १७ नोव्हेंबर रोजी भारतीय वंशाच्या हिंदू आणि शीखांसाठी आवश्यक जीवन प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. ब्रॅम्प्टन त्रिवेणी कम्युनिटी सेंटरने सांगितले की, पील प्रादेशिक पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही या कार्यक्रमावर अवलंबून असलेल्या समुदायाच्या सर्व सदस्यांची माफी मागतो. कॅनेडियन लोकांना येथे मंदिरांना भेट देणे असुरक्षित वाटते याचे आम्हाला दुःख आहे. कॅनडातील हिंदू समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन ही मंदिर प्रशासनाने स्‍थानिक पोलिसांना केले आहे.

३ नोव्हेंबर २०२४ रोजी खलिस्तानी समर्थकांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील कॉन्सुलर कॅम्पवर हल्ला केला होता. यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसक संघर्षाचा निषेध केला. भारतीय मुत्सद्दींना धमकावण्याचा हा भ्याड प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासोबतच त्यांनी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील संबंध तणाव वाढला आहे. भारताने कॅनडा सरकारचे आरोप फेटाळून लावले आहेत.