घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे वाईत जलसमाधी आंदोलन

घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांचे वाईत जलसमाधी आंदोलन

वाई : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही महसूल प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्याने आज लाभार्थ्यांनी वाईतील कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले.

आंदोलनात आपल्या हक्काच्या वाळूसाठी मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी सहभागी झाले होते. या वेळी महसूल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सर्व घरकुल लाभार्थी स्वप्नील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महागणपती मंदिरपासून पदयात्रेने किसन वीर चौकमार्गे तहसीलदार कार्यालयात पोचले. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी तातडीने वाई महसूल प्रशासनाला सूचना दिल्या.

यासंबंधी एक समिती गठित करून वाळू वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अन्यथा संबंधित वाळू निविदाधारक यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्या.

या आंदोलनासाठी संतोष गायकवाड, श्रीकांत निकाळजे, रूपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, रघुनाथ शेलार, सुनील मांढरे, अमर वाघमारे, सुरेश भोसले, सुजाताई कांबळे, सिद्धार्थ कांबळे आदी पदाधिकारी व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रांताधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तालुक्यातील १८०० घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळण्यासंबंधी सकारात्मक पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयाचे सर्व घरकुल लाभार्थ्यांनी स्वागत केले. मात्र, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी महसूल प्रशासनाकडून झाली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असे स्वप्नील गायकवाड यांनी सांगितले.