२०० जागाही भाजपा पार करणार नाही : आदित्य ठाकरे

२०० जागाही भाजपा पार करणार नाही : आदित्य ठाकरे

मुंबई :  भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आज मावळमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, त्यावेळी एकनाथ शिंदे दाढी खाजवत यायचे. २० मे रोजीही मातोश्रीवर आले होते. आल्यावर ते उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की, मला धमकवलं जात आहे. तुरुंगात जाण्याचं आता माझं वय नाही. मला तुरुंगात टाकतील. तुम्ही काही तरी करा, भाजपासोबत चला, असं रडगाणं त्यांनी गायलं होतं. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची पॉलिसी आहे. तर खोटं बोला पण रडून बोला ही शिंदे गटाची पॉलिसी आहे. मी तुम्हाला लिहून देतो की जे ४० गद्दार आमदार गेले त्यांच्याविरुद्ध काही ना काही धमक्या होत्या. फायली होत्या. केसेस होत्या. आरोप होतो. तसेच जे गद्दार खासदार गेले. त्यात एक इकडचे पण होते. त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकत असतो. कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबडी चोर. सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकी राहिलं तरी काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. 

तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल की, भाजपा ४०० जागा जिंकणार आहे, तेव्हा तुम्ही सांगा की, भाजपा कदाचित चंद्रावर ४०० पार जागा जिंकणार असेल. आमच्या भारत देशात भाजपा ४०० काय २०० जागाही भाजपा पार करणार नाही. काल परवा एक घोषणा माझ्या कानावर आली की ‘दक्षिणेत साफ, उत्तरेत हाफ’, हेच मी तुम्हाला सांगतोय. चारशे पार चारशे पार जे कानावर येतंय, ते तुम्हीपण समजून घ्या. तुमच्यातून कुणी भाजपाला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कुणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कुणी महाराष्ट्रद्रोह्यांना मतदान करणार आहे का? याचं उत्तर नाही असं येतंय. म्हणजे मावळची जागा आपण जिंकणार, शिरूरची जागा आपण जिंकणार, पुण्याची जागा आपण जिंकणार, बारामतीची जागाही आपण जिंकणार, मग ह्या ४०० जागा येणार कुठून? असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.