ऐतिहासिक राजधानीच्या अर्थविश्वात जनता बँकेची विक्रमी कामगिरी

ऐतिहासिक राजधानीच्या अर्थविश्वात जनता बँकेची विक्रमी कामगिरी

सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक मिळवलेल्या जनता सहकारी बँक लि साताराने ३१ मार्च  रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँकांना नॉन परफॉर्मिंग असेट (एन.पी.ए.) संकल्पना लागू केल्यापासून प्रथमच निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळवले. रिझर्व बँक ऑफ इंडिया व सहकार खात्याच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व तरतुदी करून बँकेस २ कोटी २१ लाख रुपये इतका ऑडिट पूर्व ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, जेष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी, चेअरमन अमोल मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

पत्रकात, बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, ज्येष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी बँकेच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना, २०२२-२०२३ व्या आर्थिक वर्षाअखेरील बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण १५.१६टक्के इतके होते. त्यावर संचालक मंडळ सदस्य व सर्व सेवक अधिकारी यांनी १ एप्रिल २०२२ पासूनच एनपीए वसुली संदर्भात करावयाच्या कार्यवाहीचा, थकबाकीदारांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी करावयाची धडक कार्यवाही, वसुली प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जंगम जप्ती व स्थावर जप्ती या संदर्भातील तत्परतेने कार्यवाही इ. विचार करून साचेबध्द ॲक्शन प्लॅन तयार करून तो राबवण्यात आला  व त्याचा सुयोग्य परिणाम या आर्थिक वर्ष अखेरीस दिसून आला.  संचालक मंडळ, अधिकारी व सेवक वर्ग यांनी शिस्तबध्द पध्दतीने व थकीत कर्जवसुली विषयक आखून दिलेल्या धोरणाप्रमाणे समन्वयाने कामकाज केल्यामुळे बँकेने निव्वळ एनपीएचे प्रमाण २०२२ - २३ या आर्थिक वर्षअखेरीस ७.३० टक्के, २०२३ - २४ या आर्थिक वर्षअखेरीस २.७७ टक्के तर २०२४- २५ या आर्थिक वर्षअखेरीस शून्य टक्के (ऑडिट पूर्व) राखण्यात यश आले आहे. बँकेकडील परिपूर्ण संगणकीय प्रणालीमधील ऑन गोईंग पध्दतीने एनपीए खाती वर्गीकरण पध्दत बँकेने अवलंबलेली असून एन.पी.ए. वर्गीकरण, त्याचप्रमाणे आर्थिक वर्षा अखेरीस करावयाच्या आवश्यक त्या सर्व तरतुदी बँकेने केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व वैधानिक लेखापरीक्षणमध्ये मागील तीन आर्थिक वर्षात कोणताही दोष आढळून आलेला नाही, त्यामुळे बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण ऑडिट नंतरही शून्य टक्के राहील, असा विश्वास व्यक्त केला.

बँकेस आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर २ कोटी २१ लाख (ऑडीट पुर्व) एवढा ढोबळ नफा झालेला असून त्यापैकी बँकेने संशयित बुडीत कर्जाची तरतूद २ कोटी १५ लाख केलेली आहे. त्याप्रमाणे आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेरीस बँकेकडे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे संशयित बुडीत (एन.पी.ए.) कर्ज खात्यांची आवश्यक तरतुदीपेक्षा २ कोटी १५ लाख एवढी जादाची तरतूद शिल्लक आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे सीआरएआरचे प्रमाण १२ टक्के आवश्यक असून बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर २५ टक्के (ऑडीट पुर्व) एवढे राखले आहे. त्याचप्रमाणे नेटवर्थ ५ कोटी एवढे आवश्यक असून बँकेचे नेटवर्थ १२ कोटी ५८ लाख आहे. बँकेकडील सीडी रेशो ५४.३२ टक्के एवढा असून २८ कोटी ७२ लाख रुपये एवढी कर्जे सातारा जिल्ह्यातील होतकरू, नवउद्योजक, व्यावसायिक, व्यापारी व्यक्तींना वाटप करण्याचे आहे. तरी बँकेकडील अत्यल्प कर्ज व्याजदरांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत मजबूत असून बँक व्यवस्थापनाने यापुढील काळात बँकेचा पुणे जिल्ह्यात शाखा विस्तार करण्याचे, ग्राहकांना मोबईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे ही दोन प्रमुख ध्येय निश्चित केलेली आहेत. त्याप्रमाणे सहकार विभागाकडून यापूर्वीच पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढ करण्यास परवानगी प्राप्त झालेली असून रिझर्व्ह बँकेची अंतिम मंजुरी येणे आहे. तसेच मोबाईल बँकिंग साठी रिझर्व्ह बँकेकडे पाठविलेला प्रस्तावदेखील मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, बँक मोबाईल बँकिंगसाठी तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेबाबतचे प्रमाणपत्र संगणक क्षेत्रातील मान्यताप्राप्त ऑडीटर यांचेकडून बँकेकडील संगणकीय प्रणालीची तपासणी करून घेऊन प्राप्त केलेले असून ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयास पाठवले आहे.

बँकेकडील थकीत कर्ज वसुली कामकाज, कार्यक्षेत्र विस्तार व तांत्रिकदृष्ट्या बँक सक्षम करण्याकरता केलेल्या योग्य नियोजनामुळे व त्यास संचालक मंडळातील व्हाईस चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ सदस्य जयवंत भोसले, आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, माधव सारडा, बाळासाहेब गोसावी, अविनाश बाचल, वसंत लेवे, रामचंद्र साठे, नारायण लोहार, रविंद्र माने, वजीर नदाफ, ॲड. चंद्रकांत बेबले, चंद्रशेखर घोडके, अक्षय गवळी, मच्छद्रिं जगदाळे, डॉ. चेतना माजगांवकर, सौ. सुजाता राजेमहाडीक, तज्ज्ञ संचालक राजेंद्र जाधव, चार्टर्ड अकौंटंट सौरभ रायरीकर, चार्टर्ड अकौंटंट, सेवक संचालक  निळकंठ सुर्ले, शिवाजीराव भोसले तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य विनय नागर, कर सल्लागार, पंकज भोसले, चार्टर्ड अकौंटंट, ॲड. श्रुती कदम यांनी दिलेली साथ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, अधिकारी / कर्मचा-यांनी केलेले अथक प्रयत्न यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे कुलकर्णी, मोहिते यांनी आवर्जून नमूद केले.