धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी बहीण पंकजा मुंडे मैदानात!

धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी बहीण पंकजा मुंडे मैदानात!

बीड : एकेकाळी राजकीय वैर असणारे मुंडे बहिण भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या बघायला मिळाले आहे. ज्या घडाळ्यने मुंडे बहीण भावांना वेगळे केले होते. त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे  यांनी पंकजा मुंडेंचा प्रचार केलाय, तर आता बहीण विधानसभा निवडणुकीत भावासाठी प्रचार करत आहे.

केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परळी हे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून परळीने पहिल्यांदा केंद्रीय पद भूषविले. मात्र, काका पुतण्यातील वादानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या काकाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पवारांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना नेहमीच बळ दिले. मात्र पक्ष फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्याने राजकीय वैर असणारे मुंडे बहिण भाऊ एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकी निमित्त दोघेही मुंडे बहीण भाऊ एकमेकांचं कौतुक करत आहेत. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यामुळे दोघा बहिण भावात राजकीय वैर हे नेहमीच पाहायला मिळाले. परंतु लोकसभा निवडणुकीत एकेकाळी सहकारी असणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पंकजा मुंडेंसाठी प्रचार केला. आता विधानसभा निवडणूकी निमित्त आयोजित सभेत लोकसभेच्या पराजयानंतर माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी नव्हते, मात्र तिने अनेक वर्ष संघर्ष बघितला त्यामुळे मोठ्या बहिणीला कधी जय पराजयाचा फरक पडला नाही, असं भावनिक भाषण धनंजय मुंडे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत भावाला निवडून देण्यासाठी पंकजा मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. आमचे घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले. मी ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला. याचं मला खूप चांगले वाटले. असं म्हणत या निवडणुकीत आपण एक आहोत. हे सर्वांना दाखवून द्यायच आहे. असं आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केले.