श्री गणरायाच्या मिरवणुकीत झळकले व्यापार्‍यांच्या निषेधाचे फलक

श्री गणरायाच्या मिरवणुकीत झळकले व्यापार्‍यांच्या निषेधाचे फलक

सातारा : राजपथावरून वारंवार निघणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांमुळे राजपथावरील व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस यंत्रणेला सादर केले होते. या प्रकरणाचा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निषेध केला. सायंकाळी तालीम संघ मैदानावरून गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी ‘यापुढे खण आळी येथे खरेदी करणार नाही’ तसेच ‘दसरा दिवाळीमध्ये उपाशीपोटी राहणार्‍या व्यापार्‍यांनो गणेशोत्सवात तरी कळ काढा’ अशा उपरोधिक निषेधाचे फळक झळकवले.
सातारा शहरामध्ये श्री गणरायाच्या आगमनाला केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत. मात्र सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांची संख्या लक्षात घेता बहुतांश मंडळांनी गेल्या आठवडाभरापासून श्री गणराया मिरवणुकीचे सत्र आरंभले होते. त्यामुळे राजपथावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. यासंदर्भात राजपथावरील व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सातारा शहरात गुरुवारी सायंकाळी राजपथावरील व्यापार्‍यांच्या निषेधाचे फलक झळकले. तालीम संघ मैदानाजवळील काही गणेश भक्तांनी हे फलक झळकवत व्यापार्‍यांच्या या नाराजीचा निषेध व्यक्त केला. यापुढे खणआळी येथे कोणतीही खरेदी करणार नाही त्यावर बहिष्कार असेल, असा इशारा चक्क  गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिला. या फलकांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले.
ऐन गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि राजपथावरील व्यापारी आमने-सामने आले आहेत. मात्र तरीही पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांची पोलीस यंत्रणा सतर्क आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडवला जावा, अशी अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत.