माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे

माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे

सातारा : माणूस आपले हक्काचं चांगलं घर निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतो. आपण फारतर 100 वर्षांपर्यंत जगतो. शेवटी स्मशानभूमीतच यावे लागते. आपण जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीही असेच ठिकाण आहे. हे ठिकाण सातारकरांनी चांगले ठेवले असल्याची भावना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली.

संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत 22 व्या वर्षपूर्तीनिमित्त झेरॉक्स मशीन, गॅस गिझर, सावलीसाठी बांधलेल्या शेडचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम झाले. दरम्यान, चोरगे यांनी मागील 22 वर्षांतील पट उलगडून दाखवला. यावेळी हिंदुस्थान फिडसचे नितीन माने, डॉ. प्रसन्न दाभोलकर, डॉ. चित्रा दाभोलकर, आनंदराव कणसे, संजय कदम, राजेंद्र लुणावत, बापू चोरगे, संजय कदम, विजय पवार, जगदीश खंडेलवाल, शरद काटकर, प्रा. ए. पी. देसाई, अर्चना देशमुख, संतोष शेंडे, जयदीप शिंदे, नितीन माने उपस्थित होते.

राजेंद्र चोरगे यांनी कैलास स्माशनभूमीची सुरूवात ते आतापर्यंत झालेला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, समाजात चांगली कामे करताना विरोध होतो. प्रामाणिकपणामुळेही त्रास होतो. पण, विरोध असणारी कामेच चांगली होतात. तक्रारीनंतरही शिस्त येते. अशामधून चांगली माणसेही भेटतात. यामुळेच कैलास स्माशनभूमी सारखी चांगली वास्तू उभी राहिली. ही ट्रस्टची नाहीतर सर्व सातारकरांची स्मशानभूमी आहे, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी 1999 मधील पहिली आठवण सांगितली. 1999 मधील जून महिन्यात संगम माहुलीत सायंकाळी एका अंत्यविधीसाठी आलो होतो. 

त्यावेळी अंत्यसंस्कार परिसरात घाण होती. पाऊस येत होता, काही श्वान अंत्यसंस्काराच्या ठिकाणी काहीतरी ओढत होते. हे डोळ्याने पाहिले आणि स्मशानभूमी उभी करण्याचा निर्णय घेतला. जागा उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी तत्कालिन जिल्हाधिकारी अनिल डिग्गीकर यांना आम्ही भेटलो. त्यानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला ही जागा मिळाली. समाजातून पैसे मिळाले आणि स्मशानभूमी उभी राहिली. याबरोबरच चोरगे यांनी कार्यक्रमात लाकडाऐवजी शेणीच्या वापराबद्दल माहिती दिली. त्यामुळे 30 हजार झाडांची तोड वाचली, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

या स्मशानभूमीत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये विविध पुस्तके वाचण्यास मिळतील. स्मशानभूमीत आल्यावरही चांगले विचार तयार व्हावेत यासाठी प्रयत्न असणार आहेत, असे राजेंद्र चोरगे यांनी स्पष्ट केले. तसेच दररोज स्मशानभूमीत पाच हजार लोक येतात. यामध्ये नातेवाईक तसेच परदेशातीलही लोक असतात. येथे स्वच्छता रहावी यासाठी थ्री स्टार स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.