विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये होणार विलीन?

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये होणार विलीन?

कोरेगाव : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य व कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी केले.

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व रणनीतीसंदर्भात सोरके यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुका काँग्रेस समितीची सभा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात झाली. त्या वेळी सोरके बोलत होते. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संभाव्य उमेदवार हे फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देत असून, ही बाब चुकीची व महाविकास आघाडीत तणाव निर्माण करणारी आहे.

याचे दुष्परिणाम होतील. वास्तविक, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत. अशावेळी निवडणुकीवर परिणाम होईल, असे काही संबंधितांनी करू नये, अन्यथा त्याची वरिष्ठ पातळीवर तक्रार करावी लागेल, असा स्पष्ट इशाराही सोरके यांनी दिला.

महाविकास आघाडीची ज्या घटक पक्षाला उमेदवारी मिळेल, त्या- त्या पक्षाचे काम आघाडीतील इतर पक्षांनी सामाजिक संघटना, परिवर्तनवादी डाव्या विचारांच्या संघटनांना सोबत घेऊन करायचे आहे. दलित, अल्पसंख्याक आदिवासी, भटके विमुक्त आणि समाजातील वंचित घटकांना सोबत घेऊन जातीयवादी, धर्मवादी, घटनाविरोधी, आरक्षणविरोधी, मनुवादी भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करायचे आहे, असेही सोरके म्हणाले.

कोरेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, राजेंद्र शेलार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, मनोहर बर्गे, आनंद जाधव यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जालिंदर भोसले, ललित शेख, धनंजय बर्गे, ताजमोहम्मद मौलवी, संजय धुमाळ, श्री. वर्पे, दत्तात्रय भोसले, शंकरअप्पा चव्हाण, प्रकाश सावंत, विजय कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जयवंत घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. अमर बर्गे यांनी आभार मानले.