रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत साताऱ्यात रक्तदान शिबिर व पथनाट्याचे आयोजन; ११५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत साताऱ्यात रक्तदान शिबिर व पथनाट्याचे आयोजन; ११५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली

सातारा :  ३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व अक्षय ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच सातारा शहरातील नागरिकांसाठी मंगळवार दि २० रोजी वाहतूक शाखेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ११५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या शिबिरात ३० वाहतूक पोलिसांनी रक्तदान केले.तसेच डॉग स्कॉडचे कर्मचारी, सातारा तालुका पोलीस, शहर पोलीस,जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा,महामार्ग ट्रॅफिक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन यांनीही रक्तदान करून रस्ता सुरक्षेसोबतच मानवी जीवनरक्षणाचा संदेश दिला.या उपक्रमामुळे पोलीस दल व नागरिकांमधील आपुलकी अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.दरम्यान, रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बॉम्बे रेस्टॉरंट येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्यातून वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे महत्त्व आणि मद्यपान करून वाहन चालविण्याचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. वाहतूक शाखा व जिल्हा वाणिज्य विभागाच्या सहभागातून सादर करण्यात आलेल्या या पथनाट्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश साताऱ्यात प्रभावीपणे पोहोचल्याचे यावेळी दिसून आले.