कराडमध्ये ‘बो माऊथ गिटारफिश’ची बेकायदेशीर शिकार उघडकीस

कराडमध्ये ‘बो माऊथ गिटारफिश’ची बेकायदेशीर शिकार उघडकीस

कराड : वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल–१ (भाग ई) मध्ये समाविष्ट असलेला तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आय.यू.सी.एन. (इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर) संस्थेने गंभीरपणे धोक्यात असल्याचे जाहीर करून रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या बो माऊथ गिटारफिश या दुर्मिळ माशाची कराड येथे बेकायदेशीर शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कराड व सातारा येथील अनुक्रमे अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) आणि ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी सदर माशाचा व्हिडिओ प्रसारित करून तसेच माशाचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने कारवाई करत दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, तसेच वनपाल आनंद जगताप, सुनील शिंदे आणि वनरक्षक कैलास सानप, अभिजीत शेळके, अक्षय पाटील, मुकेश राऊळकर सहभागी होते.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अशा दुर्मिळ प्रजातींची शिकार, प्रदर्शन अथवा प्रचार करणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.