सातारा : साताऱ्याच्या राजकारणात सध्या ‘मनोमिलना’चे वारे वाहत आहे. याचा परिपाक म्हणून नगरपालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला असला, तरी सातारकरांच्या नशिबी मात्र ‘अडथळ्यांची शर्यत’च आली आहे. राज्य शासनाकडून कोट्यावधींचा निधी आला, रस्ते चकाचक झाले, फुटपाथही बांधले गेले; पण साताऱ्याचे ‘स्मार्ट सिटी’ होण्याऐवजी ‘टपरी सिटी’त रूपांतर होत असल्याची संतप्त भावना आता सामान्य सातारकर सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
गेल्या काही वर्षांत खासदार आणि आमदार भाजपचे असल्याने शहरात विकासाची कामे जोरात सुरू झाली. काँक्रीटचे प्रशस्त रस्ते झाले, अद्ययावत स्ट्रीट लाईट्स लागले. मात्र, हे रस्ते आणि फुटपाथ नागरिकांच्या सोयीसाठी आहेत की अतिक्रमणधारकांच्या ‘सोयी’साठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फुटपाथवर पायी चालणे दुरापास्त झाले असून, तिथे टपऱ्या, गाळे आणि हातगाड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतापलेल्या सातारकरांनी आता नेतेमंडळींना उघडे पाडण्यासाठी सोशल मीडिया हेच हत्यार बनवले आहे. “नेते भाऊ, नेते भाऊ... तुमच्या कृपेने मिळून सगळे खाऊ!” या स्लोगनखाली सातारकरांनी आपल्या लोकप्रतिनिधींची चांगलीच धुलाई सुरू केली आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये साताऱ्याच्या सध्याच्या स्थितीवर प्रचंड उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या उपरोधिक संदेशांमध्ये सातारकरांनी नेते भाऊंच्या ‘व्हिजन’ची खिल्ली उडवली आहे. यामध्ये मोफत ‘अडथळा शर्यत’: पादचाऱ्यांना १० फुटांवर टपऱ्या चुकवत, रस्त्यावरून जीवाला धोका पत्करून चालण्याचा ‘रोमांचकारी’ अनुभव मिळत आहे.ट्रॅफिक जामचा ‘लाईव्ह शो’: पोवई नाका असो की बस स्टँड, अर्धा तास एकाच चौकात उभे राहून धुराचा आनंद घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
‘फ्लेक्सिबल’ अतिक्रमण: आज १६ फूट, उद्या ओसरी आणि निवडणुकीच्या आधी थेट अर्धा रस्ता! जागेची कोणतीही मर्यादा नाही.रस्ते चालण्यासाठी असतात आणि फुटपाथ पादचाऱ्यांसाठी, याचे भान स्थानिक पुढाऱ्यांना राहिलेले नाही. निवडून दिलेले प्रतिनिधीच ‘चिरीमिरी’ घेऊन शहराचे विद्रुपीकरण करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. एसटी स्टँडच्या गेटसमोरच व्यवसाय थाटून प्रवाशांना त्रास देण्याच्या या प्रकाराला ‘विकास’ म्हणायचे का? असा रोकडा सवाल सातारकर विचारत आहेत.
भविष्यात गुगल मॅपही हतबल होणार?
ज्या वेगाने शहरात टपऱ्यांचे अतिक्रमण वाढत आहे, ते पाहता भविष्यात साताऱ्यात गुगल मॅपलाही “पुढच्या टपरीवरून डावीकडे वळा” असे नेव्हिगेशन द्यावे लागेल, अशी मार्मिक टिप्पणी एका सुजाण नागरिकाने केली आहे. निवडणुका जिंकल्या, सत्ता आली; पण शहराचा श्वास कोंडणाऱ्या या अतिक्रमणांवर पालिका प्रशासन हातोडा चालवणार की ‘नेते भाऊं’च्या दबावाखाली साताऱ्याची ‘टपरी सिटी’ होणार? याकडे आता सातारकरांचे लक्ष लागले आहे.